विबास

 कुणी एक वात्रट माझ्या आत

अल्पवयीन डोळ्यांचा

पिंगट नजरेचा

परदेशी पापण्यांचा

शाळकरी धडधडीचा 

वावरतो लपतछपत

मिचकवित मिश्कील पापण्या

रेंगाळतो मागेमागे

कटिबंधाला धरून धरून 

हसत राहतो आसक्तीचं पान चघळत हलकटासारखा ! 

 वेडा, एकटक पाहत राहतो सारखा

अनेक निष्क्रिय रात्रीनंतर जाग आल्यासारखा 

सारख्या त्याच्या गुदगुल्या 

आणि हात बिनधास्त कुठेही

चिमटे काय काढतो, फुंकर काय मारतो 

बाहेर काढतो तो भरलेल्या घरातून 

पाठलाग करायला लावतो 

फोन करायला लावतो

घोगऱ्या आवाजात बोलायला लावतो 

त्याने घट्ट धरलेय मला पहिल्या पावसासारखे  

तो उभं करतो मला माझ्याच स्वप्नातल्या रंगमहालात

म्हणतो कसा " स्वप्न अडकविण्यासाठी  

सरळसोट खिळा काय कामाचा ? 

तू वाकडा हो हुकासारखा 

आणि घुस कुठेही कुठल्याही निमंत्रणाच्या भिंतीत 

पीळ  स्वतःला कुठल्याही बादलीत

वाळत पड कुठल्याही तारेवर, 

डुलत रहा सुकेपर्यंत  

चावट आहे विबास, 

कुणी त्याला थोपवू शकत नाही 

बायकोची मैत्रीण, मित्राची बायको 

नर्स, शेजारीण, मोलकरीण, डॉक्टरीण कुणी नाही.

त्याचं अनीतिमान राज्य आहे इतकं गतिमान की

त्याला थोपवणं  कठीणकठीण आहे ...

अधिकृत नाती त्याला सहन होत नाहीत फार काळ

कायदेशीर बंधनावर तो शिंकतो जाहीर

खोंडच तो अनधिकृत बागेत उंडारणारा 

तो उघडतो त्याचा काऊंटर  कुठेही कधीही ....  

त्याला स्पर्शाची भूक आहे 

त्याला आधाशी ओठांची अधीरता हवी आहे,

उताराची दिशा सोडून तो धावत येतो पुराच्या 

पाण्यासारखा कुठूनही घरे तुडवीत 

आणि शिरतो मांड्यात ... छातीत ... सर्वांगात .... 

बेमुर्वत ... तहानल्यासारखा .

 सारखा अपडाऊन करीत तो फिरतो माझ्यातून 

बसलाय माझ्यासकट कित्येकांच्या 

संसाराच्या वाकड्यावर 

प्रेमाच्या यार्डातली मच्युअर्ड  फुलपाखरे 

उडतात त्याच्याच तालावर 

विबास म्हणजे नात्यांच्या शोधात निघालेल्या 

हुरहुरीचा जॉगिंग पार्कच ... ..  

विबास असतं कातडीतून निघालेलं फुलपाखरु 

पहिल्याच भेटी फडफडणारं .. बागडणारं

विबास आहे उपसल्यानंतरही भरत जाणारं भेटीचं तळं. 

विबास म्हणजे आडमार्गात हुकमी बंद पडणारी नियमांची कार  

विबास म्हणजे भेटीचा भंडारा उधळणारी स्पर्शाची जेजुरी. 

विबास म्हणजे रिक्षात अचानक पडणारा मांडीवरचा अनोळखी हात. 

विबास म्हणजे अनोळखीपणात लपून राहिलेली युगायुगाची ओळख.

विबास म्हणजे पुराच्या किनाऱ्याला लागलेलं नि 

पुरामुळेच वाचलेलं दोन फळकुटांच तारू 

विबास म्हणजे अत्यंत खाजगीपणाचं सुगीचं बहरातलं शेत.

विबास म्हणजे पटकन बुडवणारा आणि बुडून वाचवणारा 

संबंधाचा चमचमणारा डोह. 

विबास म्हणजे माणूसपणात घुसणारा नात्यांचा 

तगमगता स्क्रू ड्रायव्हर      

 विबास म्हणजे अंतरंगातल्या लाटा जिवंत करणारं 

दोन माणसाचं कॉम्पॅक्ट  जहाज 

विबास म्हणजे मिंडभोवती घोटाळणारं अतिशास्त्रीय गाणं  

विबास म्हणजे जमिनीवर उगवणारं अठ्ठाविसावं नक्षत्र

 

विबास म्हणजे नव्या आरंभाची सुरुवात 

अगोदरच्या टाळून केलेली. 

विबास म्हणजे नात्याचं वर्जिन सुख नात्यापुढंच.  

विबास म्हणजे नव्या कृष्णाची नव्या राधेला नवी हक

विबास म्हणजे आतल्या मीरेची बाहेरच्या वाळवंटात 

थिरकणारी अतृप्तीची उमदी पावलं 

विबास म्हणजे हरवलेपणाच्या मुठीत सापडल्यानं 

हसणारं माणसाचं बाहुलं.

 विबास म्हणजे सरळसोट संसाराला पडलेलं सुदैवी भोक

विबास म्हणजे वरवरच्या नात्यांना छिलून तीक्ष्ण झालेलं मनस्वी टोक  

विबास ... जन्माची खूण  पटल्यानंतर  डोळ्यातून 

उडणारं होकाराचं   तीर्थ

विबास ... टिकटिकीचं  नवं   पंचांग 

काही सुदैवांच्याच हाती लागणारं  

स्वतःच्याच फडफडण्यानं नवं होणारं 

आणि नवेपणातच हसत हसत नष्ट होणारं

 विबास आहे जगातल्या सर्व आश्चर्यांच्या अगोदरचं 

आणि शेवटपर्यंत  टिकणारं आश्चर्य 

विबास आहे  नात्यांचा प्राण जो गेल्यावर 

शिल्लक राहतं संबंधाचं रोगट कलेवर

 विबास ... माणूसपणाची नवीकोरी नाळ 

नव्या जन्मात नेऊन शांत निजवणारी         

नव्या रक्ताने जुन्या शरीराला भिजवणारी.  

विबास आहे सप्तपदीनंतरचं आठवं अपरिहार्य पाउल 

विबास म्हणजे घराबाहेरचं भरभक्कम खरं घर.

विबास आहे औषध लग्नाच्या आजारावरचं, 

पेशंटला उठवणारं आणि नंतर 

पेशंट सहित आख्खा वॉर्ड पेटवणार ....           


        अरुण म्हात्रे 

        "कोसो मैल दूर आहे चांदणी "  मधून